मंगळवार, ६ मे, २०१४

रवींद्रनाथ टागोर (७ मे १८६१–७ ऑगस्ट १९४१).



टागोर, रवींद्रनाथ : (७ मे १८६१–७ ऑगस्ट १९४१). जगप्रसिद्ध भारतीय कवी, कलावंत, शिक्षणतज्ज्ञ आणि तत्त्वचिंतक. रवींद्रनाथांचा जन्म कलकत्ता येथे पिरालीनामक ब्राह्मणांच्या ठाकूर उपनावाच्या कुटूंबात झाला. त्यांचे वडील देवेंद्रनाथ (१८१७–१९०५) आणि आई शारदादेवी (१८२६/२७–१८७५). त्यांच्या एकूण पंधरा अपत्यांपैकी रवींद्रनाथ चौदावे. ठाकूर कुटुंबाचे मूळ आडनाव कुशारी. वर्धमान जिल्ह्यातील ‘कुश’ हे त्यांचे मूळ गाव. तेथून यशोहर गावी स्थलांतर. जातिबहिष्कारामुळे आपले यशोहर (जेसोर) गाव सोडून महेश्वर व शुकदेव हे त्यांचे पूर्वज कलकत्त्याच्या दक्षिणेला गोविंदपूर गावी स्थायिक झाले. पुढे पंचानन कुशारी ह्या पूर्वजाने ईस्ट इंडिया कंपनीच्या कामाचे ठेके घ्यायला सुरुवात केली. त्या काळी ब्राह्मणेतर लोक ब्राह्मणांना ‘ठाकूर मोशाय’ अशा बहुमानार्थी नावाने संबोधीत. इंग्रज कत्पानांनी ‘ठाकूर’ चा ‘टागोर’ असा उच्चार केला.ज्यांना गुरुदेव असे ही संबोधले जाते, हे एक ब्राह्मो पंथीय, चित्रकार, नाटककार, कादंबरीकार, बंगाली कवी, संगीतकार होते. १९ व्या शतकाच्या उत्तरार्धात व २० व्या शतकाच्या प्रारंभी यांच्या कार्यामुळे बंगाली साहित्यात व बंगाली संगीतात एक आमूलाग्र बदल घडून आला. रवींद्रनाथ हे भारताचे व आशियाचे पहिले नोबेलविजेते होते





प्रार्थना



विपत्तीमध्ये तू माझे रक्षण कर
ही माझी प्रार्थना नाही;
विपत्तीमध्ये मी भयभीत होऊ नये
एवढीच माझी इच्छा|


दुःखतापाने व्यथित झालेल्या माझ्या मनाचे
तू सांत्वन करावेस अशी माझी अपेक्षा नाही.
दुःखावर जय मिळवता यावा
एवढीच माझी इच्छा|


जगात माझे नुकसान झाले
केवळ फसवणूक वाट्याला आली;
तर माझे मन खंबीर व्हावे
एवढीच माझी इच्छा|


माझे तारण तू करावेस वा मला तारावेस ही माझी प्रार्थना नाही.
तरून जाण्याचे सामर्थ्य माझ्यात असावे
एवढीच माझी इच्छा|


माझे ओझे हलके करून
तू माझे सांत्वन केले नाहीस तरी माझी तक्रार नाही
ते ओझे वाहायची शक्ती मात्र माझ्यात असावी
एवढीच माझी इच्छा|


सुखाच्या दिवसांत नतमस्तक होऊन
मी तुझा चेहरा ओळखावा
दुःखांच्या रात्री जेव्हा, सारे जग फसवणूक करील,
तेव्हा तुझ्याविषयी माझ्या मनात शंका मात्र निर्माण होऊ नये, एवढीच माझी इच्छा| 
-रवींद्रनाथ ठाकूर